परिचय

This is the header banner section for the current page titled "परिचय".

सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
PWD Palghar Logo

सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर

पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आधारस्तंभ

परिचय

पालघर—जिथे अरबी समुद्र आणि सह्याद्री रांग एकत्र येतात; जिथे वारली चित्रकला, तारपा नृत्य आणि औद्योगिक क्रांती एकाच मातीत श्वास घेतात. ही भूमी आहे घोलवडच्या रसाळ चिकूची, वाडा–कोलमतांदळाच्या चविष्टतेची, सातपाटीच्या जगप्रसिद्ध ‘राज्यमासा’ चंदेरी पापलेटची, तसेच केळवा/माहिम/बोर्डीच्या रम्य समुद्रकिनार्यांची. इथे तारापूर अणुशक्ती प्रकल्प, डहाणू औष्णिक विद्युत केंद्र यांसारखे आधुनिक उद्योग आणि वसई–तारापूर किल्ल्याचा समृद्ध इतिहास एकत्र नांदतात.

या भूमीत वारली, कातकरी व मल्हार कोळी आदिवासी बांधवांचे साधे जीवन आणि महानगरांची गती यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. सागरी, नागरी व डोंगरी विविधतेने नटलेल्या, वैभवशाली, सुरक्षित व जोडलेल्या पालघरच्या उज्ज्वल भविष्यासाठी बांधकाम विभाग कटिबद्ध आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती

पालघर हा पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग होता. प्रशासकीय सोयीसाठी १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि महाराष्ट्र राज्यातील ३६ वा नवीन जिल्हा म्हणून पालघरची निर्मिती झाली. हा जिल्हा उत्तर कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पश्चिम उतारावर पसरलेला आहे.

जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ४,६९७ चौ. किमी. आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण अंतर्गत अधीक्षक अभियंता यांच्या अधिनस्त, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग—पालघर हे कार्यालय कार्यरत आहे. विभागांतर्गत वसई उपविभाग क्र. १, पालघर उपविभाग क्र. १ व क्र. २, डहाणू आणि तलासरी उपविभाग कार्यरत आहेत.